आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई!

पुणे : अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या आणि कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याचा खून प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा राणोजी आंदेकर (वय 64 )याच्यासह त्याच्या 13 साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायदे अंतर्गत मकोका कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

आयुष कोमकर याचा पाच सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून नानापेठेतील पार्किंग मध्ये खून करण्यात आला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी विरोधी टोळीचे गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून केला. आयुष कोमकर हा बंडू आंदेकर यांचा नातू होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आठ आरोपींना अटक केली आहे. काही आरोपी फरार आहेत. पोलिसांनी बंडू आंदेकर सह तुषार वाडेकर (24), स्वराज वाडेकर (19), वृंदावनी वाडेकर ( 40 ),अमन युसुफ पठाण उर्फखान (22) ,सुजल मेरगु ( 23), यांना पोलिसांनी बुलढाणा परिसरातून अटक केली. याशिवाय गुन्ह्यानंतर लगेच यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली होती .आजपर्यंत आठ जणांना अटक झाली आहे.
कृष्णराज आंदेकर (40 ), शिवम आंदेकर (31) , लक्ष्मी आंदेकर (60) ,अभिषेक आंदेकर (21) , आणि शिवराज आंदेकर ( 20) ,हे आरोपी अजूनही फरार आहेत . शहरातील वातावरण या टोळी युद्धामुळे अशांत झाले आहे . यामुळे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीत्ते यांनी या टोळी विरुद्ध मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव बनसोडे आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सखोल तपासानंतर आंदेकर टोळी वर मकोका लावण्याचा आदेश दिला आहे.

