चार धोकादायक सराईत गुन्हेगारांवर “एमपीडीए” कायद्यान्वये कारवाई!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी चार धोकादायक सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश पारित केले आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव करणारा व उत्तर महाळुंगे, चाकण, खेड ,शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक व्यवस्थेत बाधा पोचवणारा खून, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, अपहरण करणारा, घातक हत्यारे जवळ बाळगणारा धोकादायक व अट्टल गुन्हेगार रामदास मारुती साळुंखे (वय 37, रा. आंबेठाण ता. खेड जि. पुणे) याच्यावर आठ गंभीर गुन्हे नोंद आहेत. या आरोपीस नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा अर्जुन बिरबल राठोड (वय 41, रा. रासे, ता. खेड) या अट्टल गुन्हेगारावर पाच गुन्हे दाखल आहेत. हरसुल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजी नगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे .यामध्ये गावठी हातभट्टी दारूची विक्री करणे सारखे गुन्हे दाखल आहेत.
उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्य करणारा व उत्तर महाळुंगे, चाकण, हिंजवडी, पौड पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक व्यवस्थेत बाधा पोहोचविणारा शरद ज्ञानेश्वर मोरे (वय 27,रा. रिहे, मोरेवाडी ता. मुळशी) या अट्टल गुन्हेगाराला कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. खून, जबरी चोरी, दरोडेचा प्रयत्न, खून करण्यासाठी अपहरण, शस्त्रे बाळगणे आदी पाच गंभीर गुन्ह्याची नोंद त्याच्यावर आहे.
चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व महाळुंगे एमआयडीसी, चाकण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा अट्टल गुन्हेगार रंजीत लक्ष्मण येरकर (वय 19, रा. शहा पेट्रोल पंपाच्या मागे, नाणेकरवाडी, ता. खेड) याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी करिता अपहरण करणे, धाकड-दपाषा, धारदार हत्यारे जवळ बाळगणे सारखे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत एकूण चार कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच 2025 मध्ये एम. पी. डी. ए कायद्यान्वये 35 स्थानबद्धतेच्या कारवाया सराईत गुन्हेगारांवर करण्यात आल्या आहेत. ही माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे .अट्टल गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी एम. पी. डी. ए कायद्यान्वये कारवाई करण्याची सूचना पोलीस उपायुक्त गुन्हे शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण व महाळुंगे एमआयडीसी विभाग) सचिन कदम ,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (चाकण उत्तर पोलीस स्टेशन), श्रीमती रूपाली बोबडे (पीसीबी गुन्हे शाखा) पोलिस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सचिन चव्हाण, पोलीस हवालदार व्यंकप्पा कारभारी, गोविंद नरळे, अमोल निघोट, ऋषिकेश झनकर, यांच्या पथकाने केली आहे.

