शरद पवारांची खेळी; महायुतीला धक्का?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पंढरपूर, प्रतिनिधी : पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आधी महाविकास आघाडीमध्ये असलेले पाटील अचानक भाजपच्या गोटात गेले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची साथ देत अभिजीत पाटील भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे.
अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजय काकडे यांच्यापाठोपाठ शरद पवारांचा फडणवीसांना आणखी एक दणका मानला जात आहे. अभिजीत पाटील यांनी आधीच माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईतून अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला होता. आधी शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या अभिजित पाटील यांनी कारखान्यावरील कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबाही जाहीर केला होता. दुर्दैवाने दोन्ही उमेदवारांना पराभवाचा झटका बसला.