तळेगाव दाभाडे येथील तळ्यात तरुणी-तरुणाची आत्महत्या!

पिंपरी : एकमेकांना ओळखत असलेल्या तरुणीने आणि तरुणाने आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील तळ्यात दोघांचे मृतदेह मिळून आले. साक्षी कांतीकुमार भवार (वय २२, रा. वराळे, ता. मावळ, मूळगाव बऊर, ता. मावळ), मंगेश प्रकाश बोराटे (२७, रा. वडगाव मावळ, मूळ रा. भांगरवाडी, लोणावळा, ता. मावळ) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश बोराटे हा माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत कामाला होता. तसेच साक्षी भावर ही तळेगाव दाभाडे येथील एका माॅलमध्ये कामाला होती. दरम्यान, रविवारी (दि. २४ ऑगस्ट) सायंकाळी साक्षी ही कामावरून घरी न आल्याने कुटुंबियांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर तळेगाव स्टेशन जवळ महावितरण कार्यालयाजवळील तळ्याजवळ साक्षीची बॅग, ओढणी आणि मोबाइल सापडला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाने शोध घेतला असता रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास साक्षीचा मृतदेह तळ्यातील पाण्यात मिळून आला.
दरम्यान, मंगेश हा रविवारी घरातून बाहेर पडला मात्र, तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी वडगाव मावळ पोलिसांकडे धाव घेतली. मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास मंगेश याचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील तळ्यात मिळून आला. तळ्याजवळ मंगेशची दुचाकी मिळून आली. साक्षी आणि मंगेश हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या मोबाइलवरून तांत्रिक तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.