जाब विचारल्याने तरुणावर चाकूने हल्ला!

पिंपरी : मोटारसायकलचा कट लागल्याच्या वादातून एका युवकावर चाकूने हल्ला करून मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास नेहरूनगर भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ घडली.
संत तुकारामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश राकेश पारचा (वय २२, रा. पत्राशेड, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. धिरज संदीप शिंदे (वय २१, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी युवकाचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. २५) याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे रस्त्यावरून जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून कट मारला. फिर्यादीने त्याला जाब विचारला असता पारचा याने शिवीगाळ करून मोटारसायकलच्या डिकीतून चाकू काढला आणि फिर्यादीच्या मानेला पकडून डोक्यावर चाकूने वार केला. यात फिर्यादी जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संत तुकाराम नगर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

भोसरीत अल्पवयीन कामगाराचा हात तुटला!
पिंपरी : ए-वन इंजिनिअरिंग कंपनीत सुरक्षा साधनांशिवाय प्रेस मशीनवर काम करताना एका अल्पवयीन कामगाराचा हात प्रेसमध्ये अडकल्याने चार बोटे व तळहात तुटला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी आलुरे (वय ४५, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन कामगाराने शनिवारी (दि. २५) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीचे सुपरवायझर आरोपी आलुरे याने फिर्यादीला कोणतीही सुरक्षा साधने न देता आणि प्रशिक्षणाशिवाय प्रेस मशीनवर कामाला लावले. काम सुरू असताना मशीनचे डाय अचानक खाली आल्याने फिर्यादीचा हात मशीनमध्ये अडकला आणि चारही बोटे आणि तळहात तुटून गंभीर दुखापत झाली.

