दुर्गा टेकडीवर `अलाइव्ह`द्वारा वृक्षारोपण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्ट सन २००९ पासून विविध उपक्रमांद्वारे निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे. निगडीच्या दुर्गा टेकडी येथे अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा देशी वृक्षारोपणाचा उपक्रम ‘एक दिवस निसर्गासाठी’ द्वारे वृक्षारोपण करण्यात आले. सन २०१० पासून दर वर्षी पावसाळ्यात हा उपक्रम राबवला जात असून, उपक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. अलाइव्हच्या विश्वस्तांनी तयार करुन ८ ते ९ वर्षे जोपासलेली ६ ते ९ फूटांपर्यंत वाढलेली देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. यात बेल, आंबा, जांभूळ, बुच, वड, खैर, बदाम, भोकर, पिंपळ, हिरवा चाफा, लिंबू, नांद्रूक, पपई, आवळा अश्या १४ प्रकारच्या एकूण ३८ रोपांचा समावेश आहे. अलाइव्हचे सचिव चैतन्य राजर्षी यांनी अनेक इमारतीवर उगवून आलेली वड, पिंपळ रेस्क्यू केलेल्या रोपांना सुद्धा लावण्यात आले.
उपक्रमा विषयी माहिती देताना अलाइव्हचे संस्थापक अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला म्हणाले, “देशी वृक्ष निसर्गचक्रातील महत्त्वाचे घटक आहेत. मनुष्य निसर्गचक्रात केंद्रस्थानी नसून आपण संपूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहोत. त्यामुळे निसर्गाला अनुसरून, आदर करणारी जीवनशैलीच आपल्याला तगवू शकेल. देशी वृक्षांमुळे प्राणवायू गुणवत्तेत वाढ तर होते. त्या बरोबर येथील पक्ष्यांना अन्नासाठी विविध फळे, रातथारा तसेच घरट्यासाठी सुरक्षित जागा या काटेरी झाडांमुळे मिळणार आहे. देशी वृक्षांना सुरवातीची ३ ते ५ वर्षे जोपासण्याची आवश्यकता असते, त्यामुळे ते जगण्याचे प्रमाण वाढते. निसर्ग संवर्धनात जास्तीत जास्त जनसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही गेले १५ वर्षे प्रयत्नशील आहोत.”

पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाचे निवृत्त अभियंता व ज्येष्ठ निसर्गप्रेमी उल्हास भावे यांच्या हस्ते पहिले रोप लावून उपक्रमाची सुरवात करण्यात आली. अरिहंत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे प्रा. समीर पाटील विद्यार्थ्यांसह या उपक्रमात सहभागी झाले. अनेक निसर्गप्रेमी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी स्वत: खड्डे खणून अत्यंत उत्साहात वृक्षारोपण केले. उपक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पाटील यांनी केले आणि चैतन्य राजर्षी यांनी आभार मानले. सहभाग घेणार्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

