महाराष्ट्रात दहा दिवसांची गडकिल्ल्यांची आयकॉनिक रेल्वे टूर होणार सुरू!

मुंबई : महाराष्ट्रात गड किल्ल्यांना व ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारी रेल्वेची आयकॉनिक टूर सुरू करण्यात येणार आहे ,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एक अलौकिक कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या नावाने ही टूर सुरू होणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर सुरू होणार आहे. त्यामध्ये अतिशय सुंदर अशी आयकॉनिक रेल्वे टूर असणार आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणे , सांस्कृतिक स्थळे आहेत त्यांना जोडण्याचे काम रेल्वे विभागांकडून होणार आहे. ही आयकॉनिक रेल्वे टूर दहा दिवसांची असणार आहे ,असे फडणवीस यांनी सांगितले. रेल्वे विभाग महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी जवळपास एक लाख 73 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशन रीडेव्हलपमेंट साठी घेतले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा विकास होत आहे .यावर्षी रेल्वे बजेटमध्ये 24 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत.

रेल्वेच्या या आयकॉनिक टूरमुळे भारतातील आणि भारताबाहेरील गडप्रेमींना पर्यटनाची एक मेजवानीच मिळणार आहे .छत्रपतींचे गडकिल्ले किती मजबूत होते याची प्रचिती जगभरातल्या पर्यटकांना यामुळे अनुभवता येणार आहे. याच गडकिल्ल्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या मुघलाला जेरीस आणले होते.