महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत १० मृत्यू

शेकडो भाविक जखमी, मौनी अमावस्येचे आजचे शाही स्नान रद्द; आखाडा परिषदेचा निर्णय
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात काल मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली आणि दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजचे शाही स्नान आखाडा परिषदेने रद्द केले आहे.
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. कोट्यवधि भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. मात्र काल रात्री (मंगळवार) कुंभ मेळ्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आखाडा परिषदेने ही माहिती दिली आहे.
मंगळवारी संध्याकाळी अमावस्या सुरू झाल्यानंतर भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येण्यास गर्दी सुरू केली होती. त्यातच स्नानापूर्वी चेंगराचेंगरी झाली. मृतांचा नेमका अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. शेकडो भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. महाकुंभामध्ये मौनी अमावस्येच्या दिवसाचा अमृतस्नान हा महत्त्वाचा विधी मानला जातो. आज १० कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. १४४ वर्षांनंतर हा दुर्मिळ योग जुळून येत आहे.