पुण्यात घडलाय खुनाचा भयंकर प्रकार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुणे शहरात एका महिलेच्या खुनाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिलेचा खून करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदी फेकल्याचे उघडकीस आले आहे.
खराडी येथे नदीपात्रात एका १८ ते ३० वयोगटातील तरूणीचा मृतदेह आढळला आहे. हात, पाय आणि डोके कापून टाकण्यात आले असून केवळ धडाचा भाग पात्रात सापडला आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरण अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसरात जवळच असलेल्या नदी पात्रात एका महिलेचे हात, पाय आणि डोके नसलेला मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अद्याप मरण पावलेल्या तरूणीची ओळख पटलेली नाही.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच अज्ञात इसमाने तरूणीला ठार मारून एका धारदार शस्त्राच्या सहाय्याने खांद्यापासून हात आणि खुब्यापासून पाय कापून टाकले आहेत. आणि मुळा – मुठा नदीच्या पात्रात तिला टाकून दिले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाच्या सूचना दिल्या आहेत.