बाप्पा निघाले गावाला..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पारंपरिक वाद्य पथकांच्या साथीने, विविध धाडसी क्रीडा प्रकार सादर करीत, ढोल ताशांच्या पथकांच्या तालावर पुण्यात पारंपरिक पद्धतीने प्रचंड उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. राज्यात सर्वत्र बाप्पााला निरोप देणारे भावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर वाजतगाजत असूनही काहिशा जड अंतःकरणानेच बाप्पााला निरोप दिला जात आहे.

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर सकाळपासून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या गेल्या आहेत. ढोल पथकांचा जल्लोष आहे. दुपारी अकरा वाजल्यापासून मानाच्या गणपतींची मिरवणूक बघायला येणाऱ्या पुणेकरांनी रस्त्यावर गर्दी आहे. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची चित्तवेधक मूर्ती डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वर, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा या मंडळांचे रथ एका मोगामोग एक मिरवणूक मार्गांवर दाखल झाले. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, खासदार मुरलीधर मोहेळ पुण्यात मिरवणुकीसाठी उपस्थित होते.

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोर कामायनी संस्थेच्या पथकाने लयबद्ध वादन करीत उपस्थितांची मने जिंकली. विष्णूनाद शंख पथक हे लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्या प्रसन्न शंखनादाचे उपस्थित भारावून गेले. ऐतिहासिक वेशभूषा करून लहान मुले विविध पथकांमध्ये दाखल झाली होती. झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक अशा अनेक जिग्गजांच्या वेशभूषा लक्ष्मी रस्त्यावर अवतरल्या आहेत.

रांगोळीतून दाखविला सामाजिक आशय
पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम करीत आहे. गेल्या २५ वर्षापासून अकादमी हे काम करते आहे. यंदा व्यसनाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, हा विषय घेऊन कलाकारांनी त्यावर आधारित रांगोळी काढली आहे. दहा चौकांमध्ये रांगोळ्यांचे रेखाटन सुरू आहे. तरूणांच्या व्यसनाधीनतेचा विषय प्रत्येक चौकातून मांजडला जात आहे. सिगारेट पासून सोशल मीडियाचं व्यसन यामध्ये मांडले आहे. दरवर्षी ३०० ते ३५० कलाकार यात भाग घेतात. २५ ते ३० किलो रांगोळी आणि २००० किलो रंग त्यासाठी वापरले जात आहेत.