जुन्या गाड्या खरेदी विक्रीच्या एजंटाने चार चाकी कार पळविली!

पिंपरी : जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा एजंट असल्याचे सांगून एका व्यक्तीच्या इंडिका गाडीचा व्यवहार करून गाडीची कंडीशन बघण्यासाठी वाकड ब्रिज पर्यंत राऊंड मारतो असे सांगून गाडी घेऊन पसार झाला व फसवणूक केली. ही घटना 27 फेब्रुवारी 2026 रोजी पंचरत्न चौक, हिंजवडी ता. मुळशी येथे घडली.
या प्रकरणी संतोष बापुराव लष्कर (वय 26, रा. बकोरी फाटा, गुलमोहर पार्क दोन, वाघोली, पुणे) मुळगाव- धावेडी ता. जि. जालना) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रघुनाथ वसंत देशमुख (वय 43, रा. तळेगाव दाभाडे असे गाड्या खरेदी विक्री एजंट व आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीस आपण जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा एजंट असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या इंडिका गाडीचा सौदा करून गाडीची कंडीशन बघण्यासाठी वाकड ब्रिज येथून एक राऊंड मारून येतो व लगेच आल्यानंतर विसर पावती रक्कम देतो असे सांगून गाडी घेऊन निघून गेला. परंतु तो परत आला नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार गाडीची मागणी केली असता आरोपी यांनी गाडी अथवा गाडीच्या व्यवहाराची रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे तपास करत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू!
पिंपरी: भरधाव ट्रकने दुचाकी स्वराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 13 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाटा मोटर्स गेट समोर, बीआरटीच्या बाहेरील बाजूला, शाहूनगर, चिखली येथे घडली.
याबाबत एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .टाटा मोटर्स कंपनीचा ट्रक नंबर एच. आर. 73 बी/ 73 40 वरील अनोळखी चालक (नाव पत्ता माहीत नाही)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला यांचे सासरे टी.एस शिवरासकृष्णन (वय 75) हे होंडा शाईन गाडी क्रमांक एम. एच. 14 एम. एल./ 80 26 या दुचाकीवरून राहते घरापासून चिंचवड डी मार्ट येथे जात असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टाटा मोटर्स गेट समोर बीआरटीचे बाहेरील बाजूच्या रोडवर पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार रोडवर पडले. ट्रकच्या उजव्या बाजूचे पुढील चाक मयत दुचाकी स्वराच्या दोन्ही पायावरून गेले. डोक्यास मार लागला यामुळे ते गंभीर जखमी झाले. यातच उपचारादरम्यान टी.एस शिवरासकृष्णन यांचा मृत्यू झाला. अपघात करून ट्रक चालक तेथून फरार झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश खडसे हे पुढील तपास करत आहे.

