स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक!

पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे.
स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा चेहरा ओळखला आहे. पण घटनास्थळावरुन पसार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. पुणे पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. पाठोपाठ आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आणि त्याच्या विषयीची इतर महिती पण मिळवली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. चोऱ्या करणे, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांना वाहनात बसवणे आणि निर्मनुष्य ठिकाणी चाकूचा धाक दाखवून लुबाडणे, दरोडा असे वेगवेगळे गुन्हे केलेल्या दत्तात्रय गाडे विरोधात शिक्रापूर येथे दोन तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांतील त्याच्या विरोधातले खटले प्रलंबित आहेत. याआधी त्याला एका दरोड्याप्रकरणी शिक्षा झाली होती.
आतापर्यंतची पोलीस कारवाई
माहिती, फोटो आणि सीसीटीव्ही फूटेज हाती येताच पोलिसांनी १३ पथके तयार केली. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर तपासणी सुरू करण्यात आली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड याठिकाणी आरोपीचा शोध सुरू झाला. आरोपी ज्या ठिकाणी लपण्याची शक्यता आहे, अशा सर्व संभाव्य ठिकाणी शोध सुरू आहे.