पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन!

महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद
पिंपरी : अक्षरांचा सुगंध, शब्दांची लय आणि माय मराठीबद्दलचा अपार अभिमान… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन करण्यात आले.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन ज्येष्ठ कवी राज आहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह शहरातील रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कविसंमेलनात स्थानिक कवींच्या ओजस्वी उपस्थितीत मराठी भाषेची श्रीमंती, तिची परंपरा आणि तिचे अभिजात सौंदर्य कवितांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले गेले.
कवी हेमंत जोशी यांनी ‘रक्तात नांदतो शब्द, मराठी शुद्ध नसे हे युद्ध, सदा कविबद्ध मराठी…’ या ओळींनी सभागृह भारावून टाकले. त्यांच्या शब्दांतून मराठीबद्दलचा जाज्वल्य अभिमान आणि भाषेच्या अस्मितेचा स्वर घुमला. कवी सुहास घुमरे यांनी ‘मी नाणेघाटात मराठीचं झाड लावलं…’ या कवितेतून मराठीची पाळेमुळे इतिहासात किती खोलवर रुजलेली आहेत, याची जाणीव करून दिली. कवी सीमा गांधी यांनी ‘पुढला जन्म माय मराठी अक्षरांचा मिळावा…’ या ओळींमधून मराठी भाषेची गोडी आणि तिच्यावरील निष्ठा हृदयस्पर्शीपणे व्यक्त केली. तर, कवी मानसी चिटणीस यांनी ‘संतबोलीने पावन झाली अमृत कहाणी…’ या कवितेतून संतपरंपरेने मराठी भाषेला दिलेल्या अमूल्य वारशाचे गुणगान केले. कवी मिनल साकोरे यांनी ‘उगा मी शहरी आहे…’ ही कविता सादर करून आधुनिक जीवनातील बदलत्या भावविश्वावर भाष्य केले.
याचबरोबर कवी अरुण बोऱ्हाडे, सुरेश कंक, चंद्रकांत धस, डॉ. पौर्णिमा कोल्हे, साविताई इंगळे, माधुरी विधाते, वंदना इन्नाणी, नंदकुमार कांबळे, अण्णा जोगदंड, मनीष परिहार, दिनेश साबळे, नेहा जाधववार या कवींनी आपल्या सशक्त सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. प्रत्येक कवीने आपल्या शब्दफुलांनी मराठी भाषेच्या वैभवाला नवी उजळणी दिली. सुभाष चव्हाण यांनी शंख वाजवण्याची कला सादर केली.
यावेळी ज्येष्ठ कवी राज आहेरराव म्हणाले की, ‘कविता केवळ लिहिण्यासाठी नसते, ती जगण्यासाठी असते. काव्यभावना जशी अंतर्मनात असते, तशीच ती सादरीकरणातही जिवंत व्हावी. काव्यसाद आत्मसात केल्याशिवाय कविता पूर्णत्वाला जात नाही,’ असे देखील ते म्हणाले.

