फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
Live news

प्राधिकरणात दिसलेला बिबट्या जेरबंद

प्राधिकरणात दिसलेला बिबट्या जेरबंद

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच रविवारची सकाळ ही काहिशी आळसावलेली असते. पण प्राधिकरणातील सेक्टर २४ मधील नागरिकांसाठी मात्र आजची रविवार सकाळ ही भीती, घबराट आणि नंतर सुटकेचा निःश्वास अशी गेली. कारण होते, भल्या सकाळी या परिसरातील वस्तीत आलेल्या बिबट्याचे.

पिंपरी चिंचवडमधील प्राधिकरणाच्या सेक्टर २४ परिसरात आज सकाळी बिबट्या दिसला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, वनविभाग आणि रेस्क्यू टीमने दोनच तासात त्याला जेरबंद केले आणि बिबट्या संवर्धन केंद्रात नेण्यात आले. बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमके काय घडले?
पिंपरी चिंचवड परिसरातील प्राधिकरण निगडी प्राधिकरण मधील लोकमान्य रुग्णालयाच्या पाठीमागील भागामध्ये सकाळी साडेसहा वाजता बिबट्याचे दर्शन झाले आहे, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या परिसरात असलेल्या बंगल्यांच्या आवारातून याचा वावर सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. या सीसीटिव्हीचे फुटेज व्हायरल झाले आणि शहरभर बिबट्याच्या आगमनाची वार्ता पसरली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. पाषाण येथील रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी प्राधिकरणामध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांनी संबंधित जागेची पाहणी करून घेतली. दरम्यान, या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. त्यांनी कबीर उद्यानाच्या परिसरातील रस्ते बंद केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला बिबट्या कोठे आहे याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना तो उद्यानाच्या सुरक्षारक्षकाच्या घरात असल्याचे दिसले. त्यानंतर रेस्क्यू टीममधील एका सदस्याने डार्टच्या माध्यमातून इंजेक्शन दिले आणि काही मिनिटातच साडेअकराच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्याला पकडून रेस्क्यू टीमने बावधन येथील बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"