पुण्याजवळ कोंडावडे येथे हेलिकॉप्टर कोसळले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्याजवळ पौड परिसरात डोंगराळ भागात एका हेलिकॉप्टरचा आज अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुण्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान खराब आहे. हेलिकॉप्टर उड्डाणामध्ये निश्चित खराब हवामानाचा अडथळा आला असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या खराब हवामानामुळेच हेलिकॉप्टर पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. पायलटसह चार जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. पायलटसह दोघे यात जखमी झाले आहेत.
मुळशी तालुक्यातील कोंडावडे या गावात हे हॅलिकॉप्टर कोसळले.ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 नावाचे हे हॅलिकॉप्टर आहे. यामध्ये कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. दिर भाटिया,अमरदीप सिंग आणि एस पी राम यांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला जात होते.
हेलिकॉप्टर पडल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक धावत आवाजाच्या दिशेने आले. त्यावेळी हेलिकॉप्टरचा सांगाडा दिसला. पायलट त्यातून सुरक्षित बाहेर पडला आहे. बचावकार्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहचले असून बचाव यंत्रणाही दाखल झाल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त हाती आलं आहे. स्थानिकांनी सुद्धा अपघात स्थळी धाव घेत मदत केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)