लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांचे हृदयस्पर्शी काव्यसादरीकरण!

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम
पिंपरी : राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजं रुजवणाऱ्या छत्रपती शिवबांचा इतिहास जेव्हा कवितेच्या शब्दांतून जिवंत होतो, तेव्हा मातृत्व, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. समई आणि वात जशी अंधार चिरून प्रकाशाची दिशा दाखवतात, तशीच जिजाऊंच्या संस्कारांची ज्योत आणि शिवबांच्या कर्तृत्वाची कहाणी आपल्या सशक्त शब्दांतून उलगडत लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘आई’ या विषयावरील आपल्या कवितांच्या सादरीकरणातून स्वराज्याच्या जडणघडणीतील मातृत्वाची भूमिका प्रभावीपणे अनुभवायला लावली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा समारोप लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या कवितांद्वारे चिंचवड येथील संभाजीनगर येथे पार पडला.
या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, तुषार हिंगे, कुशाग्र कदम, माजी महापौर मंगला कदम तसेच महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, अजित कोडलकर, गिरीश तेलंग, संजय कलागते, निलेश नारखेडे, मंगेश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी साई किरण मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी “हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय..” ही प्रा. स. ग. पाचपोळ यांची कविता स्वतः सुरबद्ध केलेल्या चालीमध्ये सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर आईच्या त्याग, माया, संघर्ष आणि प्रेम यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या कविता सादर करत त्यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
माय तान्ह्या लेकराला, सत्य सांगे जिजाबाई, देवा शिवबा नावाची, जन्मा आली हो नवलाई…, तुझ्यामुळे या जन्माला खरा अर्थ मिळाला, नाहीतर माझा श्वासही व्यर्थच राहिला…, जात्यामध्ये धान्य नाही तरीही माय ओढायची, डोळ्यामध्ये पाणी नाही तरी माय रडायची…, मायेले बाप म्हणलो, बापाले माय म्हणालो…, बाप शिवाराचा धनी, माय शिवाराची राणी…, बाप बाभळीचा काटा ऊन पिऊन जगतो, माय पारंब्या पारंब्या पसारा भुईत.., अशा अनेक भावस्पर्शी ओळींमधून आईचे कष्ट, त्याग आणि निस्सीम प्रेम यांचे जिवंत चित्रण करत कवी प्रशांत मोरे यांनी उपस्थितांना भावनिक केले. या काव्यसादरीकरणाद्वारे मातृत्वाची ताकद आणि संस्कारांची भूमिका अधोरेखित करत लेकराच्या जडणघडणीत आईचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला.

