मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात लघुशंका करत तरुणाचा ‘नंगानाच’!

पुण्याची संस्कृती लागलीया बिघडायला
पुणे : शास्त्रीनगर चौकातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून रस्त्यातच लघुशंका करत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे.
या प्रकरणातील तरुणाचे नाव गौरव अहुजा असे आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे मनोज अहुजा यांनी म्हटले आहे.गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तरूण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही, हे ताब्यात घेतल्यानंतर पाहून कारवाई करणार आहोत. पण, सध्यातरी व्हिडिओत बिअरची बॉटल दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आलेली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. कल्याणीनगर भागात गेल्यावर्षी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुण्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.