दिवसाढवळ्या फ्लॅट मध्ये चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद!

पिंपरी : फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी करून पळून जात असताना सोसायटीमधील नागरिकांनी चोरट्याला हटकले, मात्र पिस्तुलाचा धाक दाखवून चोरटा पळून गेला. नागरिकांनी एका सराईत चोरट्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास भोसरी येथील इंद्रायणी नगर मधील चैतन्य पार्क, साई दर्शन सोसायटीत घडली .

सागरसिंग सुरतसिंग उर्फ फँटॅस्टिक बावरी अंधेरेले (वय 27, रा. गुरुगोविंद सिंग नगर ,जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी धर्मेंद्र अमरेंद्र झा (वय 53, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दुचाकीवरून सोसायटीमध्ये आले. त्यांनी धर्मेंद्र झा यांच्या दरवाज्याची कडी काढून लॅच तोडले .घरामधील कपाटातून 55 हजार 500 रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांची दोन चांदीची नाणी चोरली. चोर सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकीवरून पळून जात असताना नागरिकांना त्याचा संशय आला .त्यावेळी सोसायटीमधील नागरिकांनी त्यांना अडवले. सागर सिंग यांच्याकडे चाकू होता. नागरिक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने नागरिकांवर चाकूने हल्ला केला. यात सचिन ज्ञानेश्वर पिंगळे आणि ध्वजशेर शाही हे दोघे जखमी झाले. तर सागर सिंग यांच्या साक्षीदाराकडे पिस्तूल होते त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पळून गेला.
नागरिकांनी सागर सिंग याला चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सागर सिंग हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात जालना जिल्ह्यातील सदर बाजार आणि नागपूर जिल्ह्यातील कोडली पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. सागर सिंग यांच्याकडून चोरी केलेला ऐवज, घर फोडीचे साहित्य, धमकवण्यासाठी वापरलेला चाकू तसेच काडतूस व पिस्तुलाचे मॅक्झिन पोलिसांनी जप्त केले. पळून गेलेल्या संशयितचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. चोरट्यांनी वापरलेली दुचाकी ही चोरीची असून संबधित दुचाकी चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

