लाडकी बहीण कार्यक्रमाच्या बसचा अपघात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे कार्यक्रमासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या बसचा दुपारी पाऊणच्या सुमारास अपघात झाला आहे. यात नऊ महिला जखमी झाल्या आहेत.
मांजरोणे घाटात बसला अपघात झाला असून जखमी महिलांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा अपघात झाला आहे. महिलांना घेऊन जाणारी ही एसटी बस चाळीस फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना या बसचा मांजरोने घाटात अपघात झाला. म्हसळा येथून माणगावकडे जाताना बस बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात काही महिला जखमी झाल्या आहेत. एसटी बस चालक नवीन असल्याने मुख्य वळणावरील अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते.
गाडीचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे कळते. रजनी रमेश डोंगरे (वय ५० वर्षे, डोंगरोली), सुजाता सिताराम चिंचाळकर (वय ५० वर्षे, रानवडे), छाया सहादेव चाग (वय ६० वर्षे, रानवडे), निलिमा गायडे (वय ४५ वर्षे, रानवडे), नेदिनी नथुराम तामकर (वय ५० वर्षे, रानवडे), अश्विनी गोविंद भागरे (वय ४५ वर्षे, रानवडे), प्रविना सहदेव गावडे (वय ५५ वर्षे, रानवडे), चना सहादेव जाधव (वय २१ वर्षे, रानवडे), शरिता दिपक पाटील (वय ५० वर्षे, रानवडे) या महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
माणगाव येथील माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्गावरील धनसे मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ५० हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था या मैदानात करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींना भाऊबीज भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुमारे ५०० पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.