बीआरटी लेनमध्ये दुचाकीस्वराने प्रवासी बसला दिली धडक;एकाचा मृत्यू

पिंपरी : बीआरटी लेनमध्ये नो एन्ट्री असताना दुचाकीस्वराने चार चाकी गाडीला ओव्हरटेक करताना समोर प्रवासी बस आल्याने दुचाकीस्वराने ब्रेक मारला. त्यामुळे त्याची गाडी स्लिप होऊन तो बस वर आदळला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेला सागर भागवत देवरे (वय 30 ) या तरुणाचा मृत्यू झाला.. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास 18 स्पॉट समोर शिवार चौक रहाटणी येथे घडली.

पी एम टी बसचालक नागेश लक्ष्मण गायकवाड (वय 28, रा. भारत मातानगर, फुगे वस्ती, दिघी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिषेक पुंडलिक शेरमाळे (वय 26, रा. 9 श्रीहरी अपार्टमेंट, साई ज्योत पार्क, नखाते वस्ती असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुचाकी स्वार हा बी आर टी लेनमध्ये नो एन्ट्री असताना रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून गाडी चालवत होता. त्याच्या समोरील चार चाकी गाडीला ओव्हरटेक करताना समोरून पीएमपीएलची प्रवासी बस येत असल्याचे पाहून दुचाकी स्वराने जोरात ब्रेक मारला असता त्याची गाडी स्लिप होऊन फरपटत फिर्यादीच्या (एम एच 12, वाय बी/ 3705 बसच्या बंपरला धडकला. त्यामध्ये दुचाकी चालक आरोपी याचा उजवा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेला सागर भागवत देवरे (वय 30 )याला जोरदार धडक बसल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करत आहेत.

