सुरेश धसांच्या निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप ;जाहीर माफी मागावी:प्राजक्ता माळी

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल बीडचे फिल्म इंडस्ट्रीतील आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा उडाली आहे. आमदार धस यांनी बीडमधील ‘इव्हेंट पॉलिटिक्स’ असा शब्द वापरून धनंजय मुंडेंवर टीका केली. यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले. यावर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सुरेश धसांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे.
प्राजक्ता माळी म्हणाल्या, कलाकारांचे काम म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. मी परळीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत काम केले आहे. एक महिला कलाकार म्हणून मला अत्यंत निंदनीय वाटते. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही. अशा प्रकारची टिप्पणी करून, आपण महिलांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात आणि त्यांचा कर्तृत्वही कमी लेखत आहात
प्राजक्ता माळीने पुढे असेही स्पष्ट केले की, फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. राजकारणासाठी फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची नावे वापरणे अत्यंत चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हास्य निर्माण करण्यासाठी अशा टिप्पण्यांचा वापर होतो, पण यामुळे त्या महिलांच्या आयुष्यात वादळ येऊ शकते, त्यांचे करीअर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत त्या मानसिक त्रासात जाऊ शकतात. माझ्या आईला दीड महिना शांत झोप लागली नाही. माझ्या भावाने सर्व सोशल मीडिया डिलीट केला. माझ्या कुटुंबावर याचा गंभीर परिणाम झाला आहे असं ती म्हणाली.
प्राजक्ता माळीने या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली असून, मी त्यांना विनंती करते की त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन असे तिने सांगितले.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखिल विनंती केली की, याबद्दल ठोस कारवाई करावी. “समाजात फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची प्रतिमा अशा प्रकारे डागाळणं आणि त्याला तोंड देणं सोपी गोष्ट नाही,असं ती म्हणाली.महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात नाही का? अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करते. या व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या. पण प्रसारमाध्यमं त्यातूनच हजार व्हिडीओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे वादळ येऊ शकतं, त्यांचं करीअर बरबाद होऊ शकतं, त्या नैराश्यात जाऊ शकतात. त्या आत्महत्या करू शकतात, अशा उद्विग्न भावना प्राजक्ता माळीने यावेळी व्यक्त केल्या.
कायदेशीर मार्गाने कारवाई करेन
तिथं बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? हे सगळं कितपत योग्य आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. त्यांनी माफी मागितली नाही तर, कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन, असंही तिनं म्हटलं आहे.