शिवाजीनगर बसस्थानकात १६ मजल्यांची इमारत उभी राहणार!

महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे नव्या इमारतीचे भूमीपूजन
पुणे : महामेट्रोच्या भूयारी स्थानकामुळे ५ वर्षांपूर्वी वाकडेवाडी येथे स्थलांतरीत झालेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या पूर्वीच्याच जागेवरील नव्या इमारतीच्या बांधकामाला अखेर मुहुर्त मिळाला. महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे नव्या इमारतीचे भूमीपूजन होणार आहे. तळमजल्यावर बसस्थानक व वरील बाजूस सरकारी तसेच खासगी कार्यालयांची १६ मजली इमारत असे नव्या बसस्थानकाचे स्वरूप असेल. या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६०० कोटी रूपये असून भूमीपूजनानंतर ३ वर्षात त्याचे बांधकाम पूर्ण होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मंत्रालयात बुधवारी सकाळी या स्थानकाच्या संदर्भात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (ऑन लाईन), महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी बैठकीला होते.