रतन टाटांच्या आठवणीत गहिवरले कामगार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे पिंपरी चिंचवडचे भूषण होते. त्यांच्यामुळे शहरास ओळख मिळाली, या व्यक्तिमत्वास भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.
उद्योजक रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. टाटा मोटर्स मित्र परिवार यांच्या वतीने श्रद्धांजली सभा घेण्यात आली. त्यात रतन टाटा यांच्या आठवणी सांगताना कामगार गहिवरले. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील रजनीगंधा हाउसिंग सोसायटी व टाटा मोटर्स मित्र परिवार यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सागर चिंचवडे, यशराज चिंचवडे, टाटा मोटर्स परिवाराचे दिलीप कोकरे, संजय रौंदळ, प्रकाश चव्हाण, शंकरराव सावंत, गोरोबा कोल्हे, सुरेश कदम, धनराज पाटील, रघुनाथ पो ळ, बाळासाहेब माने, रमेश ननवरे, शरद पटेल, बिबीशन चौधरी, औदुंबर गणेशकर, विजय सुदर्शनी, दिलीप गडदे आदी उपस्थित होते.
दिलीप कोकरे म्हणाले, ”काही वर्षांपूर्वी त्यांना भेटण्याची संधी मिळाली. खरच देव माणूस होते. एकदम साधी रहाणी कामगाराप्रती अतीव प्रेम, कामगार हिताचा सदैव विचार भावणारा आहे. अशा संस्थेत काम करायला मिळाले आम्ही खरे भाग्यवान होत.”
अध्यक्ष सागर चिंचवडे म्हणाले, ‘उद्योग क्षेत्रातील टाटा यांचे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. कामगारांचे ते देवच होते. तसेच त्याचे देश आणि समाजाप्रती असणारी भावना अनेकवेळा प्रतीत झाली आहे. उद्योग आणि कामगार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.’