अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचे आज निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरूण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर आदी नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच अळी मिळी गुपचिळी, जागो मोहन प्यारे, माझा होशील ना, होणार सून मी ह्या घरची या मालिकांमधूनही ते घराघरात पोहोचले होते.
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पुनरागमन केले होते. त्यांनी परदेश दौऱ्यांनाही प्रारंभ केला होता.