इंदापुरात शरद पवारांनी भाकरी फिरवली; हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’ फुंकणार?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर खिंडार पडत आहेत. अशातच आता भाजपला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे ‘तुतारी’ फुंकणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा, अशा आशयाचे फलक लावले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’हाती घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. यानंतर आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याचे समजते. तसेच पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत्या ७ ऑक्टोबरला इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहेत. त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार की नाही? हे स्पष्ट होईल.