शारदीय नवरात्रोत्सव असे का म्हणतात?

भारतात सर्वत्र उद्यापासून (३ ऑक्टोबर) घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. हे नवरात्र शरद ऋतूमध्ये साजरे केले जाते म्हणून त्म्हयाला शारदीय नवरात्र असे म्हटले जात नाही. तर त्यामागे काही पौराणिक कथांचा संदर्भ आहे. तो नेमका काय, हे जाणून घेऊया..
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
गणेशोत्सवानंतर चाहूल लागते ती देवीच्या उत्सवाची. गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात भारतभर साजरा होणारा उत्सव म्हणजे, नवरात्रोत्सव अर्थात शारदीय नवरात्र. पण शारदीय नवरात्र म्हणजे नेमकं काय, हे बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. गेल्या काही वर्षात नवरात्र म्हणजे फक्त घागरा चोळी घालून संध्याकाळी गरबा, दांडिया खेळायला बाहेर पडणं असं चित्र मर्यादित झालंय. पण झाला उत्सवाचा एक भाग. त्या पलिकडेही काही आहे. आपण जो उत्सव साजरा करतो, त्यामागची पार्श्वभूमी सुद्धा समजून घ्यायला हवी.
आता, शारदीय नवरात्रोत्सव हे देवी शारदेशी संबंधित आहे. प्रजापती दक्ष यांची कन्या गौरी अर्थात पार्वती तीच दुर्गा. ही अतिशय बुद्धिमान होती. अतिशय नाजूक आणि सुकुमार होती. अशी गौरी दुष्ट राक्षसांचा संहार करणारी तेजस्विनी कशी बनली. याचा एक सुंदर घटनात्मक क्रम पुराणात आहे. तेच या शारदीय नवरात्र उत्सवाचं महत्त्व आहे. महादेवांनीच तिला साक्षात जे ज्ञान दिले त्यामुळेच तिच्या हातून महिषासुरासारख्या महाभयंकर राक्षसाचा संहार केला गेला. हे काम तिच्या हातून घडलं त्यामुळे हा संहार करून झाल्यानंतर दसऱ्याचा दिवस होता, तेव्हा ती कैलासावर पुन्हा विराजमान झाली.
तिच्या या महान कार्याची दखल घेऊन तिची स्तुती करण्यासाठी सर्व देव त्यांच्या गणांसह कैलासावर एकवटले. या देवांना तिनं स्वतः सांगितलं की मी कशा प्रकारे बदलले, मी एवढी शक्तिमान कशी झाले, याचं कारण म्हणजे महादेवांनी दिलेली विद्या. विद्येची झाली सरस्वती शारदा. त्यामुळे शारदेचं महत्त्व दुर्गैनं सांगितलं तेव्हा जमलेल्या सर्व देवतांनी देवी शारदेचं कैलासावर पूजन केलं. म्हणून या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. हे शारदीय नवरात्र ज्या ऋतूमध्ये होते, तो शरद ऋतू. या प्रसंगामुळे ऋतुला शरद हे नाव पडलं आहे. दसऱ्यादिवशी आपण देवी शारदेची पूजा पाठ्यपुस्तकांची या रूपात करतो. मिळालेलं ज्ञान लोककल्याणासाठी वापरावं, असा उद्देश आहे.