माण-हिंजवडी ते वाकड रस्ता दुरुस्त न केल्यास मेट्रोची परवानगी निलंबित

पिंपरी : माण-हिंजवडी ते वाकड चौक रस्त्याची 15 दिवसांत दुरुस्ती करा, अन्यथा मेट्रोला दिलेली कामाची परवानगी निलंबित करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने मेट्रोला दिला आहे.
निकृष्ट रस्त्याबाबत विविध पत्रे व बैठका घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीला सूचना करूनही विभाग-1 म्हणजेच मान-हिंजवडी ते वाकड चौक या पट्ट्यातील मेट्रो कॉरिडॉर च्या बाजूने रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी गंभीर सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे, या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांना पत्र पाठवले आहे.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी आणि त्यांच्या ईपीसी कंत्राटदाराकडून रस्ते दुरुस्तीच्या कामात विलंब झाल्यामुळे, हिंजवडी आयटी असोसिएशन आणि स्थानिक रहिवाशांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. या विषयावर उपमुख्यमंत्री कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगर आयुक्त कार्यालय तसेच विविध व्यासपीठावर वेळोवेळी चर्चा झाली आहे, परंतु पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी आणि त्यांच्या ईपीसी कंत्राटदाराने तातडीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
या संदर्भात पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीने माण- हिंजवडी- वाकड या रस्त्यावरील वाहतूक नेहमी सुस्थितीत राहावी यासाठी आवश्यक संसाधने त्वरित तैनात करण्यात आल्याची खातरजमा करण्याची सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पीएमआरडीए व पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी यांच्यात झालेल्या सवलत करारातील तरतुदीनुसार 15 दिवसांच्या आत या निर्देशाचे पालन केले नाहीतर मेट्रोच्या कामाची परवानगी निलंबित करून मेट्रोचे काम थांबवण्यात येईल, असा इशाराही डॉ. म्हसे यांनी दिला आहे.