बदलापूर प्रकरणातील आरोपीला २४ पर्यंत पोलिस कोठडी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला २४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण कोर्टात त्याला हजर करण्यात आले.
बदलापूरमधील एक नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराचा प्रकार उघड झाल्यानंतर काल (मंगळवार) दिवसभर बदलापूरात संतापाची तीव्र लाट उसळली होती. शेकडो पालकांनी पहाटेच या प्रकरणी दाद मागण्यासाठी शाळेसमोर धाव घेतली. मात्र, शाळेकडून काहीच दाद न मिळाल्यामुळे नागरिकांनी रेल्वे रूळांवर ठिया मारला. अनेक लोकल, मेल काल रद्द कराव्या लागल्या. आंदोलाने तीव्र स्वरूप धारण केले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी नागरिकांची आणि पालकांची भेट घेऊन या प्रकरणी सरकार उचलत असलेल्या टप्प्यांची माहिती दिली. त्यानुसार आरोपीला न्यायालयात आज दाखल करण्यात आले आणि त्याला २४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.