मुठा नदीत पुन्हा विसर्ग सुरू

पुणे, प्रतिनिधी : पुणे आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रभरापासून शहर आणि धरण परिसरात पाऊस कोसळत आहे. पानशेत, खडकवासला या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून खडकवासल्यातून पुन्हा एकदा मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पानशेत धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून सकाळी आठ वाजता ६ हजार ६९३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग आणि विद्युत निर्मितीगृहद्वारे ६०० क्यूसेक असा एकूण सात हजार २९३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सकाळी नऊ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक विसर्ग करण्यात आला. पाऊस असाच सुरू राहिला तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा अधिक केला जाण्याची शक्यता आहे.

