एकतर्फी प्रेमातून चाकणमध्ये तरूणीची हत्या

पिंपरी, प्रतिनिधी : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एकवीस वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगिक भागात आंबेठाण (ता. खेड) येथे घडली आहे.
अविराज रामचंद्र खरात (वय-२२, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राची विजय माने (वय-२१, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड, मूळ रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर अवघ्या बारा तासात सोमवारी (२९ जुलै) कराड ते सातारा महामार्गावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राची आपले शिक्षण पूर्ण करून चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होती. आरोपी अविराज प्राचीच्या शोधात चाकणमध्ये आला होता. प्राची हिच्यावर अविराज एकतर्फी प्रेम करत होता. प्राची हिने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून अविराज याने चिडून धारदार हत्याराने तिच्या गळ्यावर पोटावर वार करून तिचा खून केला व त्यानंतर पळून गेला.
पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याने प्राचीचा मोबाईल देखील सोबत नेला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. या घटनेचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ पथकाने तपास सुरू केला. तपास पथकाच्या दोन टीम तयार करून सदर आरोपीचे वर्णन व त्याच्या ताब्यातील पल्सर दुचाकी मोटर सायकल त्यांच्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरु होता.
आरोपीच्या मूळ गावी सांगली येथे तपास करून आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील पल्सर मोटरसायकलवरून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या दोन्ही तपास पथकांनी सातारा ते कराड महामार्ग परिसरात सापळा रचला. पोलीसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी दहा ते पंधरा किलोमीटर दुचाकी दामटली. मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल व दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.