मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी

पिंपरी,प्रतिनिधी, : रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे चिंचवड येथील शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी समाधी मंदिरात आज (बुधवारी) सकाळी पवना नदीचे पाणी सकाळी शिरले आहे. खबरदारी म्हणून मंदिरात न जाण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाण्याने संपूर्ण समाधी मंदिराला वेढा घातला आहे.मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. मंदिर परिसरात पाणी शिरले की, पाऊस काळ चांगला झाला अशी आख्यायिका आहे.पावसाचा असाच जोर वाढत राहिला तर नदीच्या पाण्याची पातळी अजून वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मंदिर आणि नदीकाठ परिसरात सेल्फी काढणे, स्टंटबाजी करणे व परिसरात गर्दी करणे या गोष्टी टाळाव्यात,अशा सूचना मंदिर प्रशासन, चिंचवड पोलिस व पिंपरी- चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Chinchwad)दिल्या आहेत.
पवना धरण परिसरात मागील 24 तासात 374 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदी पात्रावरील बरेच पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिंचवड येथे पवना नदीने मोरया गोसावी मंदिरात प्रवेश केला आहे.