फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
माहिती तंत्रज्ञान 

भोसरीत लवकरच संगणक संशोधन विकास केंद्र

भोसरीत लवकरच संगणक संशोधन विकास केंद्र

पिंपरी,प्रतिनिधी : भोसरी सेक्टर क्रमांक बारामधील दहा एकर जागेवर संगणक प्रशिक्षण, संशोधन, विकास आणि शैक्षणिक सुविधांच्या विस्तारासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी दिली.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) पुणे यांचे वतीने भोसरी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेवर ही इमारत उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी भोंडवे यांनी केली. त्यानंतर ते बोलत होते. निवृत्त कर्नल तसेच कार्यकारी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक ए.के. नाथ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, प्रफुल्ल पुराणिक या वेळी उपस्थित होते.

कोणते अभ्यासक्रम येथे असतील?
माहिती तंत्रज्ञानासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातील वेगाने विकसित होणाऱ्या टाउनशिपमध्ये ही जागा धोरणात्मकदृष्ट्या सुरक्षित असणार आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात सर्वसमावेशक शैक्षणिक सुविधेची स्थापना केली जाणार आहे. त्यामध्ये व्हीएलएसआय, एचपीसी, बिग डेटा, एआय यांसारख्या विशिष्ट आणि उच्च श्रेणीतील तंत्रज्ञान क्षेत्रात विविध सी-डॅक आयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

काय आहेत या प्रकल्पाचे फायदे?
या प्रकल्पामुळे सी-डॅकच्या विस्तारास मदत मिळेल. तसेच उच्च श्रेणीतील कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल. सध्या, सी-डॅक ऍडव्हान्स कंप्युटींग ट्रेनिंग स्कुल (ऍक्ट्स), पुणे येथे ६५० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या मोठ्या मागणीमुळे ही क्षमता आता एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

या इमारतीची रचना आधुनिक असेल. तसेच सुसज्ज वाहनतळ, हेलिपॅड, ड्रोनपॅड, सोलर सिस्टीम, पर्यावरणपूरक परिसर यांचा समावेश असणार आहे. उच्चस्तरीय शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक संशोधनाच्या संधी प्रदान करण्याच्या अनुषंगाने प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"