तडीपार आदेशाचे उल्लंघन; गुन्हेगाराला अटक!

पिंपरी : दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा हद्दीमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याशिवाय त्याच्याकडे बेकायदेशीरपणे घातक शस्त्र कोयता आढळून आला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करून तरुणाला अटक केली.
याप्रकरणी पोलिस अंमलदार दीपक मोरे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम अनिल भोसले (वय 30, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम भोसले हा सराईत गुन्हेगार असून मार्च 2025 मध्ये त्याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र या गुन्हेगाराने हद्दीमध्ये येण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता तळेगाव शहरात प्रवेश केला. त्याच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक!
पिंपरी : आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. दीपक भास्कर बर्फ (वय 26, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर भुरे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियम परिसरात एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता 51 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. पिस्तूल आणि काडतुस जप्त करून तरुणाला अटक करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

