सायबर भामट्यांनी मनी लॉन्ड्रींगची भिती दाखवून पावणेदोन कोटीची केली फसवणूक!

पिंपरी : मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची तब्बल 1 कोटी 69 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली. बावधन परिसरात 20 ऑगस्ट ते 11 ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 76 वर्षीय पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम शर्मा, विजय खन्ना आणि फसवणुकीची रक्कम स्वीकारणाऱ्या बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्लीतील दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगून भामट्याने वृद्धेशी संपर्क साधला. त्यांच्या नावावरील सिम कार्ड वरून अक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पाठवण्यात पाठवण्यात आला. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यानंतर विजय खन्ना नावाच्या भामट्याने व्हाट्सअप कॉल करून आपण मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी केली. महिलेच्या कॅनरा बँकेतील खात्याबाबत पंचवीस तक्रारी आल्या असून त्यामध्ये मनी लॉन्ड्रींगशी संबंधित व्यवहार झाल्याचे झाल्याचे सांगितले. विश्वास बसवा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा शिक्का असलेले कथित अटक वॉरंटही दाखवण्यात आले. कारवाईची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास महिलेला भाग पाडले. अटकेच्या भीतीने महिलेने टप्प्याटप्प्याने 1 कोटी 69 लाख 98 हजार रुपये पाठवले. भामट्यांनी रिझर्व बॅंकेच्या लेटरहेडवर सही शिक्का असलेली कथित पावतीही पाठविली. मात्र पडताळणीच्या नावाखाली घेतलेली रक्कम परत न केल्याने फसवणूक उघडकीस आली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

