गॅस कनेक्शन अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक!

पिंपरी : गॅसचे कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले. अवघ्या सात रुपयांचे पेमेंट करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 79 हजार 702 रुपये लंपास करण्यात आले. ही घटना एक सप्टेंबर रोजी ताथवडे येथे घडली.

याप्रकरणी प्रसाद गुरुदास वर्धम (वय 65, रा. ताथवडे, मूळ- रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धम यांच्या मोबाईलवर महानगर गॅस कनेक्शन अपडेट करण्याबाबत संदेश आला होता. त्यातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फाईल डाऊनलोड करून सात रुपयांची पेमेंट करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 79 हजार 702 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आघाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.
दुचाकी स्वराच्या धडकेत पादचारी ठार!
पिंपरी : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत न करता चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास देहूरोड येथील शिंदे पेट्रोल पंपा जवळील सर्विस रोडवर घडली.
संजय नामदेव सुरवसे (वय 58, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पन्नास वर्षीय पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस श्रेणीउपनिरीक्षक वाव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

