पेइंग गेस्टच्या खोलीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या प्लंबरला अटक!

पिंपरी : महिला पेइंग गेस्टच्या खोलीचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या प्लंबरला बावधन पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून 6 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.याप्रकरणी मयुरी बाबासाहेब पवार (वय 32) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राकेश यशवंत दाते (वय 33, काळेवाडी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुसगाव येथील पाषाण- सुस रोडवरील ‘टांजा लिविंग अविव’ या महिला पीजी मध्ये फिर्यादी पवार राहतात. 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीचे कुलूप तोडले. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पवार आणि त्यांची मैत्रीण पूजा जाधव यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीजीसह अजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित काळेवाडी फाटा परिसरात रहात असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचून राकेश दाते याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेले 44 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे आणि सुहास दंगाडे यांच्या पथकाने केली.

तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा; 31 हजार जप्त!
पिंपरी : स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता तीन पत्त्यांचा जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून 31 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई 30 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास काका होम शेजारील मोकळ्या जागेत राहटणी येथे करण्यात आली.
याप्रकरणी रामचंद्र मारुती तळपे पोलीस नाईक, गुन्हे शाखा युनिट पिंपरी चिंचवड यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोकेश धम्मारसिंग नेपाळी (वय 51, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव), वीरेंद्र बहादुर सौद (वय 31, रा. डुक्कर खिंड पौड रोड, कोथरूड), बलबहादुर धानगडे जयगडी (वय 43, रा. भाभा हॉस्पिटल जवळ, मॉर्डन कॉलनी, शिवाजीनगर), करण तुलाराम थापा (वय 43, रा. काका होम्स जवळ, तापकीर नगर, काळेवाडी), दीपक ब्रिगेश परिवार (वय 28, रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर हे तपास करत आहेत.

