पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याने दोघांना केले जेरबंद!

पिंपरी : देशी बनावटीचे पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतूसे जवळ बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने दोघांना जेरबंद केले आहे. ही कारवाई कासारवाडी येथे नाशिक फाट्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवार 17 सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी सहाय्यक फौजदार अमित पोपट गायकवाड यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजी महादेव बहिरट (वय 50, रा.बोपोडी), आदम मगदूम पटेल (वय 56, विकास नगर, कासारवाडी) यांना अटक केली आहे. शाबीर मंजूम शेख (रा. कासरवाडी) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बंदीचा मनाई आदेश लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन करून संशयीताकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतूसे असा असा 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करण्यात आला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

कामावरून काढल्याने अधिकाऱ्यावर रोखले पिस्तूल!
पिंपरी : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने कंपनीत ‘एच आर’ अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मावळ तालुक्यातील सुदवडी येथे गुरुवार 17 सप्टेंबर रोजी घडली.
याप्रकरणी आदेश राजकुमार दुबे (वय 26, रा. महाळूंगे, ता. खेड, मूळ -रा. भदोरी, उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजा उर्फ मोहम्मद नैयर मन्सुरी (वय 26, वेलवडी, मूळ- रा. मुजफ्फरपूर, बिहार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हा कंपनीत रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत होता. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून तो कंपनीत विनापरवाना आला. फिर्यादी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत थांबले असताना संशयीताने पिस्तूल फिर्यादीवर रोखले आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

