महिलेने साथीदाराच्या मदतीने चोरली रिक्षा; दोघी ताब्यात!

पिंपरी : एका महिलेसह पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने एका साथीदाराच्या मदतीने रिक्षा चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघींना अटक करून रिक्षा हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई मंगळवार एक ऑगस्ट रोजी करण्यात आली.

जोया जुबेर गाझी (वय 25, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत पंधरा वर्षीय अल्पवयीन बालिकेला ही ताब्यात घेण्यात आले आहे. अभिषेक रवींद्र सुतार (रा. साईनगर, थॉमस कॉलनी, देहूरोड) हा या गुन्ह्यात पाहिजे संशयित आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक घर फोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संशयीतांचा शोध घेत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महिला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी साथीदाराच्या मदतीने रिक्षा चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी चोरीची रिक्षा जप्त केली. पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, सहाय्यक उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलिस अंमलदार श्रद्धा भरगुडे आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

