एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक!

पिंपरी : पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड हात चलाकीने बदलून पिन क्रमांक पहात त्यांच्या खात्यातून तीस हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली. ही घटना सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान डांगे चौक येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
या प्रकरणी उत्तम शंकर कुटे (वय 63, रा. थेरगाव, मूळ अजून, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुटे हे एटीएम मधून पैसे काढत होते. त्यावेळी आरोपीने काका तुम्ही एटीएम कार्ड उलटे टाकले आहे असे सांगून मदतीचा बहाना केला. कार्ड उलटे करून देण्याच्या पाहण्याने त्याने कुटे यांचे कार्ड बदलले. तसेच त्यांचा पिन क्रमांक ही चोरून पाहिला. त्यानंतर दुसऱ्या एटीएम मधून त्यांच्या खात्यातील तीस हजार रुपये परस्पर काढून घेतले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

पावणे दोन लाखाचे एमडी जप्त!
पिंपरी : मेफिड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एक लाख 74 हजार 900 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. ही कारवाई शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील एच ए ग्राउंड वर करण्यात आली.
ओम राजेंद्र माटे (वय 18, रा. अजमेरा, पिंपरी), साजी अश्फाक शेख (वय 23, गंगानगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अथर्व टांकसाळे (वय 25, खराळवाडी, पिंपरी) त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटेकर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संत तुकाराम नगर येथील एच.ए मैदानात अंमली पदार्थ विक्रीसाठी आले होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून एक लाख 74 हजार 900 रुपये किंमतीचा मेफेड्रोन जप्त केले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

