लोखंडी अँगल अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू; क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

पिंपरी : निष्काळजीपणाने क्रेन चालवत क्रेन चालकाने झटका दिल्याने लोखंडी अँगलचा समतोल बिघडून तो कामगाराच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत गंभीर झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण रोडवरील एस के एस फास्टनर्स लिमिटेड कंपनीत घडली. अजय मदनलाल (वय 26, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्रेन ऑपरेटर दिलीप कुमार सिताराम चौधरी (वय 32, रा. मुटकेवाडी, मूळ- रा. शिवान, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रेन चालक कंपनीच्या शॉप फ्लोअर विभागात हायड्रोलिक क्रेन द्वारे ब्रिज क्रेन खालील लोखंडी अँगल उचलून नेत असताना निष्काळजीपणे क्रेन चालवत होता. अचानक झटका दिल्याने लोखंडी अँगलचा समतोल बिघडून तो बाजूच्या अँगलला धडकला. त्यानंतर हा अँगल तिथून जात असलेल्या कामगाराच्या अंगावर पडला. कामगाराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.

