जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन कुटुंबातत मारामारी!

पिंपरी : जमिनीवर मालकी हक्काचा बोर्ड लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवार 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी मधील आंबी येथे घडली.

याप्रकरणी रंगनाथ शंकर घोजगे (वय 55, आंबी ,मावळ) यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल भागवत (वय 38 , संकेत दुडे , गणेश तांगडे सर्व रा. इंदोरी ,मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी शेडचे पत्रे व शेतीची अवजारे फेकून दिली. तसेच घोजगे यांच्या नावाच्या बोर्डला काळा रंग फसला. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ करण्यात आली.
स्वप्निल सूर्यकांत भागवत (वय 38, रा. इंदोरी ,मावळ) यांनीही तक्रार दिली आहे. त्यानुसार रंगनाथ शंकरराव घोजगे (वय 55) ,अंकुश घोजगे, मच्छिंद्र घोजगे ( सर्व रा. आंबी, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी खरेदी केलेल्या मालकीच्या जागेवर नोटीस बोर्ड लावण्यासाठी गेले असता आरोपींनी लाकडी काठीने खांद्यावर मारहाण केली. तसेच कॉलर पकडून जमिनीवर पाडत लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

