मावळ तालुक्यातील पाटण गावात भूस्खलन होऊन अख्ख कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले!

मळवली, पवना परिसरात दरड कोसळल्याने शोधकार्य
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अग्निशमन विभाग आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक अर्थात ‘पीडीआरएफ’ युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करीत आहे.

मावळ तालुक्यातील पाटण-बोरज रोड, गावात भूस्खलन होऊन अख्ख कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले मुसळधार पावसामुळे मदत करण्यात अनेक अडचणी येत होत्या. ‘एनडीआरएफ’चे पथक या ठिकाणी पोचले असून बचाव कार्य सुरू केले.. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या पाटण गावात ही दुर्घटना घडली आहे किल्ल्यावरून घसरलेल्या मातीच्या ढिगार्याखाली नंदू टिकवणे या व्यक्तीचे घर मातीच्या ढीगार्याखाली गाडले गेले. पहाटे चार वाजता ही दुर्घटना घडली आहे.
. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. पुणे येथील पाचव्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडर चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली तीस सदस्यांचे पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यसह घटनास्थळी स्थळाकडे रवाना झाले होते.
चाकण एमआयडीसी परिसरातील चिंबळी फाटा येथील एका कंपनीमध्ये रविवारी सकाळी पाणी शिरल्याने सुमारे २० ते २५ जण अडकले होते. वाघोली अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF) यांनी अत्यंत तत्परतेने मदत व बचावकार्य राबविले आहे. पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात पथकाला यश आले आहे.
मळवली (मावळ): मळवली येथे दरड कोसळून सुमारे २५ ते ३० नागरिक अडकल्याची माहिती पीएमआरडीए कंट्रोल रूमला प्राप्त झाली. त्यानुसार तात्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
आपटी गाव (पवना लेक): पवना लेकजवळील आपटी गावात दरड कोसळल्यामुळे २५ ते ३० नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मारुंजी अग्निशमन केंद्राचे वाहन पुढील मदतकार्यासाठी रवाना करण्यात आले असून, तेथे बचावकार्य सुरू आहे.
चाकण-चिंबळी फाटा: येथील एका कंपनीत पाणी शिरल्याने २० ते २५ कामगार अडकले होते. पथकाने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या मदतीने सर्व कामगारांची सुखरूप सुटका केली.
वेदांत कॉलेज (लोणावळा): मुसळधार पावसामुळे वेदांत कॉलेजमध्ये विद्यार्थी अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
जांबे गाव: जांबे गावातील ग्रामपंचायत परिसरातील घरांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील ३० ते ३५ नागरिकांना सुरक्षितपणे जवळील प्राथमिक शाळेत हलविण्यात आले.
घोरावडी स्टेशन परिसर: घोरावडी स्टेशनजवळ पाण्यात एक बस अडकली होती. बसमधील प्रवाशांना आपत्ती प्रतिसाद पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले.
कासारसाई व मंत्रा २४ वेस्ट सोसायटी: कासार साई येथील घरांमध्ये तसेच मंत्रा २४ वेस्ट सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
धानोरे गाव (आळंदी): रस्त्यावर काटेरी बाभळीचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या माहितीवरून पथकाने घटनास्थळी धाव घेत चेन सॉ व कुऱ्हाडीच्या साहाय्याने झाड कापून, क्रेनच्या मदतीने बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

