पावसाळी आपत्तीचा सामना करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ सज्ज!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाढते नागरीकरण, डोंगराळ भाग, घाट परिसर, धरण क्षेत्र आणि नद्या-नाल्यांची भौगोलिक विविधता लक्षात घेऊन ‘पीएमआरडीए’चे ‘पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक’ (पीडीआरएफ) व अग्निशमन दल हे पावसाळी आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्णत: सज्ज झाले आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणारी पूरपरिस्थिती, भूस्खलन, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि रस्ते खचणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अग्निशमन सेवा आणि ‘पीडीआरएफ’ पथकाने आपली तयारी पूर्ण केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे पथक २४ तास संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रासाठी धावून जाण्यास सज्ज करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात आवश्यकतेनुसार धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आणि जलद प्रतिसादासाठी प्रशिक्षित बचाव पथके, बोटी, रोप रेस्क्यू साहित्य व कटिंग उपकरणे सतत सज्ज ठेवण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाशी समन्वय वाढवून मान्सूनपूर्व मॉक ड्रिल्स (सराव) व प्रत्यक्ष बचाव सरावही पूर्ण करण्यात आला आहे.
या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणांचे मोठे बळ लाभले आहे. ‘पीएमआरडीए’च्या अंतर्गत सध्या फक्त तीन अग्निशमन केंद्रे कार्यान्वित असून, तेथे ६० कंत्राटी मनुष्यबळ कार्यरत आहे. या दलाच्या जोडीला आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांचे विशेष पीडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित अशा २० जवानांचा व १० वाहनचालकांचा समावेश आहे. आपत्तीच्या ठिकाणी अत्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी या पथकाला विशेष अत्याधुनिक वाहने, जीवरक्षक साधने आणि तांत्रिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात आले आहे. हे पथक मदत व पुनर्वसन कार्य, नियमित कठोर प्रशिक्षण आणि विविध यंत्रणांसोबत रंगीत तालीम करून सदैव तत्पर आहे.
आपत्ती घडल्यानंतर बचावकार्य करण्यापेक्षा आपत्तीपूर्व जनजागृती, सतर्कता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत ‘पीएमआरडीए’चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी नागरिकांना मान्सून काळात सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. मातीमध्ये मोठ्या भेगा पडणे, झाडे किंवा विद्युत खांब झुकणे, डोंगरावरून दगड घसरू लागणे, घरांच्या भिंतींना तडे जाणे किंवा जमिनीत असामान्य हालचाल जाणवल्यास ही भूस्खलनाची प्रारंभिक लक्षणे असू शकतात. अशी चिन्हे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे व प्रशासनाला माहिती द्यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ९५४५२८२९३० या ‘पीडीआरएफ’च्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनपोटफोडे यांनी केले आहे.

