दहा लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघेजण ताब्यात!

पिंपरी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दापोडी येथे दहा लाखाहून अधिक किंमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार 28 जून रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील सर्विस रोडवर सुदामाचे पोहे हॉटेल समोर करण्यात आली.
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई रणधीर माने यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर्यन रवींद्र यादव (वय 20, रा. न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे) आणि शोएब शकील शेख उर्फ वस्ताद (वय 25, रा. 1121,रविवार पेठ, पुणे )अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील सीएनजी पंपासमोर एमडी ड्रग्जची विक्री करण्याच्या उद्देशाने आले होते. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडती मध्ये 10 लाख 85 हजार सहाशे रुपये किंमतीचे 98.56 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक दुचाकी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीत हे ड्रग्ज गणेश पेठ येथील शोएब शेख यांच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले. दापोडी पोलीस ठाण्याचे सहय्यक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.

