आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला बँकॉक येथून रेड कॉर्नर नोटीसद्वारे अटक!

पिंपरी : दुबई आणि बँकोक (थायलंड) येथून भारतामध्ये कोट्यावधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला रेड कॉर्नर नोटीस आणि एलओसीच्या आधारे बँकॉक विमानतळावर ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर त्याचा ताबा घेऊन देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली. सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी जून 2024 मध्ये एकूण 13 आरोपींना अटक केली होती .अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील अटक आरोपी दीपक गाडे हा दुबई येथे जाऊन आरोपी सौरव उर्फ गणेश बाळासाहेब काळे याला भेटला होता. आरोपी गणेश काळे यास भारतातील विविध बँक खात्यांची माहिती (एटीएम, चेक बुक, बँक अकाउंट, लिंक मोबाईल नंबर, इंटरनेट बँकिंग, आयडी पासवर्ड) पाठवून त्या बदल्यात दीपक गाडे हा पैसे स्वीकारत होता हे निष्पन्न झाले. गणेश काळे यांनी सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी थेट दुबई येथे आपले मुख्य कार्यालय सुरू केले होते. तपास सुरू असताना आरोपी गणेश काळे हा हिंजवडी पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाणे गुन्ह्यामध्ये ही सक्रिय असल्याचे भक्कम पुरावे मिळाले.
उपलब्ध पुराव्याच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे आरोपीच्या प्रोव्हिजनल अरेस्ट आणि प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर 2024 मध्ये दुबई (यूएई) येथे कायदेशीर कारवाई सुरू होती. सप्टेंबर 2025 मध्ये आरोपी गणेश काळे हा दुबई सोडून बँकाँक (थायलंड) येथे पळून गेल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. आरोपी गणेश काळे हा थायलंड मधून दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. 11 जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने त्याचा अधिकृत ताबा घेतला.
आरोपी गणेश काळे यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाणे ऑनलाइन टास्क फसवणूक, हिंजवडी पोलीस ठाणे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक 18 लाख फसवणूक, सायबर पोलीस ठाणे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक 2 कोटी 66 लाख फसवणूक याशिवाय नूडल्स सायबर पोलीस ठाणे मुंबई, मालवणी पोलीस ठाणे मुंबई, सायबरबाद पोलीस स्टेशन तेलंगणा, सायबरबाद पोलीस स्टेशन तेलंगणा येथे आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, तात्कालीन पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोषण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे व पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने केली आहे.

