पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळविण्यासाठी प्रयत्न!

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक
पिंपरी : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्याची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष करून पिंपरी चिंचवडला ही जागा सोडावी असाच आग्रह शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने भारतीय जनता पक्षाने महायुतीमधील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 344 जागा, भारतीय जनता पक्षाला 306 शिवसेना शिंदे गट 68 काँग्रेस 19 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 17 शिवसेना उबाठा 11 अशी सदस्य संख्या आहे.
पिंपरी चिंचवड शहराला आज पर्यंत विधान परिषदेची उमेदवारी डावलण्यात आली असल्याने यावेळेस पिंपरी चिंचवडला प्राधान्य द्यावे अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. विधान परिषदेसाठी माजी आमदार विलास लांडे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत.
पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस कडेच होती. या मतदारसंघातून अनिल भोसले हे यापूर्वी आमदार झाले आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी असा आग्रह धरण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने देखील यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याची जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यापैकी कोणाकडे ही जागा राहील याची उत्सुकता लागून राहिली आहे. पुण्यात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत.

