पोलिसांचा पाठलाग ; आरोपी गोळीबार करत उसाच्या शेतातून फसार!

पिंपरी :चर्होली येथे तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या फरार असलेल्या आरोपींचा पाठलाग करताना आरोपींनी हवेत गोळीबार करून पलायन केल्याची घटना रांजणगाव येथील पिंपरी दुमाला येथे घडली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता मात्र पोलिसांच्या कारची धडक बसल्यानंतरही आरोपीने हवेत गोळीबार करत उसाच्या शेतात आसरा घेतला. ही घटना शनिवार 16 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

आरोपी शेखर संभाजी जाधव (वय 25) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दिघी पोलीस ठाण्यात यापूर्वीच त्याच्या विरुद्ध गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्होली येथे करण राठोड यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार फरार झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक तपास करत होते. त्यावेळी आरोपी शेखर जाधव पिंपरी दुमाला गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .त्यानुसार पोलिसांनी रांजणगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचून आरोपीला पकडण्याची तयारी केली.
आरोपी शेखर जाधव यांनी पोलिसांना पाहताच दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ कारमधून त्याच्या पाठलाग सुरू केला काही अंतरावर पोलिसांच्या कारची आरोपीच्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर आरोपी दुचाकी जागेवर सोडून पळत सुटले ,पुढे जात त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबार करत आरोपी जवळील उसाच्या शेतात घुसले पोलिसांनीही मागोमाग शेतामध्ये घुसून त्यांचा पाठलाग केला. मात्र उसाचे दाट पीक आणि अंधाराचा फायदा घेत आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांचा अतिरिक्त फोर्स घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरात नाकेबंदी करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

