दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त; एकास अटक!

संत तुकारामनगर पोलीस ठाणे तपास पथकाची कारवाई
पिंपरी : दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई संत तुकारामनगर पोलीस ठाणे तपास पथकाने केली आहे.

संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार संत तुकाराम नगर आणि परिसरातील दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वाहन चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे उकल करण्याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे संदीप आटोळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभागाचे सचिन हिरे यांनी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी संतोष शिवराम घारे (वय 44, मु. पो. ओझर्डे, ता. मावळ) यास कामशेत या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधून 11 मोटरसायकली चोरी केले असल्याचे कबूल केले. आरोपीकडून 5 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. संत तुकारामनगर पोलीस ठाणे, सहकारनगर, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी, सांगवी, तळेगाव एमआयडीसी या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोटरसायकली चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.
ही कारवाई संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक गुन्हे गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलिस अंमलदार दत्तू पाटेकर ,अनिल मोहिते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष रजपूत, सुनील धावारे यांच्या पथकाने केली.

