उसनवारीने पैसे न दिल्याने मारहाण; सोन्याची चेन चोरली!

पिंपरी : मित्राने दहा हजार रुपयांची मागणी केली असता त्यास नकार दिल्याने चिडून जाऊन फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करून डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने आरोपीने चोरून नेली. ही घटना रविवार 29 मार्च रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास टाळगाव चिखली येथे घडली.

या प्रकरणी जरीना अब्दुल मंन्सुरी (वय 28, रा. संजय गांधी नगर, काळेवाडी ब्रिज शेजारी, पिंपरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. करण विलास महापुरे (वय 36, टाळगाव चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र आरोपी बोलत थांबले असताना आरोपीने फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत असे आरोपीला सांगितले. आरोपीने चिडून जाऊन फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने व डोक्यात दगड घालून मारहाण करून जखमी केले. फिर्यादीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मासाळ हे तपास करत आहेत.

