मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाला पंधरा दिवसांचा कारावास!

मोटार वाहन न्यायालयाचा निर्णय
पिंपरी : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन न्यायालयाने कठोर भूमिका घेत 15 दिवसांचा साधा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेमुळे मद्य प्राशन करून भरधाव वाहन चालविणाऱ्यांना चांगला धडा शिकविला आहे.

31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या सुमारास एक 34 वर्षीय व्यक्ती मद्याच्या नशेत वाहन (एम एच 14 /एफएम /13 42 )चालवत असताना भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आला होता. त्यावेळी भोसरी वाहतूक विभागाने संबंधितावर कारवाई करून प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात पार पडली. न्यायालयाने वैद्यकीय चाचणीचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरत संबंधी चालकाला दोषी ठरवले. न्यायालयाने मोटार वाहन कायद्यानुसार पंधरा दिवसांची साधा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त दहा दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे.
याशिवाय भरधाव व बेदरकार वाहन चालविल्याबद्दल स्वतंत्रपणे तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला, तो न भरल्यास पाच दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे. मोटार वाहन न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की मद्य प्राशन करून वाहन चालविणे स्वतःच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.

